Powered By Blogger

Thursday, January 10, 2013

बलुतं (Baluta) Book

            खाद्या व्यक्तीची सहनशीलता किती असावी आणि खरच एखादा समाज केवळ जातिव्यवस्थेच्या आणि पारंपारिक रुढींच्या नावाखाली किती दुर्लाक्षितला जावा, याचा यथाकथित पुरावा, होय पुरावाच म्हणा कारण आजच्या पिढीचा नॅनो स्वप्नांपासून ते भव्य दिव्य मेट्रो पर्यंत इतका व्याप वाढला आहे कि असे विषय केवळ काही news चॅनलस मध्ये कधी तरी कुठे काही विपरीत घडलं तर चर्चा सत्राच्या नावाखाली विषयाची वाट सोडून भरकटताना दिसतात, पण त्यातही कित्येकदा दर्शक राजा रिमोट ने चेनल बदलून MTV लावताना दिसतो. तसं म्हंटल तर हि जातीव्यवस्थेची धगधगती आग अजूनही काही शमली नाहीं आहे, गावपातळीवर आज हि कुठे न कुठे हि आपलं विक्राळ रूप दाखवतेच. आज हि अशी अनेक खेडी आहेत जी काळाच्या अजूनही ५० वर्षे मागे आहेत. फक्त शहरी जीवनात हि आग काही प्रमाणात इतकी प्रभावी नाहीं किवा मुद्दामच तिला प्रभावी ठेवत नसावे, नाहींतर उगीच समाज व्यवस्थेच्या नावावर चालवलेल्या अगाळ राजकारणाचं पितळ उघडं होईल ह्याची धास्ती असावी. कारण कशा प्रकारचं हे जगणं असेल ह्याची कल्पना किवां सत्यस्थिती,  अप्रतिम अशा दया पवार ह्यांनी लिहिलेल्या दगडू मारुती पवार ह्यांच्या आत्मचरित्रातून बलुतं ह्या पुस्तकाद्वारे होऊ शकते.

         आता ह्याला मी केवळ मराठी साहित्य म्हणेन, उगीच दलित असा पोटशब्द जोडून त्याचं categorization करणं खरच पटत नाहीं. धर्म निरपेक्ष म्हणवून घेणारा माझा समाज, जाती आणि पोट जाती निरपेक्ष कधी होईल हे खरच एक कोडं आहे. मुळात समाजातील तृटी म्हणा कि नवल वाटावं असं जगणं अधोरेखित करण्यासाठीच कोणताही लेखक ते शब्दांकित करत असावा, पण त्याला सुद्धा जर दलित साहित्य आणि ब्राम्हणांनी लिहिलेल्या साहित्याला ब्राम्हसाहीत्या आणि कोणी अमक्या जातीच्याच अमकं साहित्य म्हणून जर संबोधायला लागलो तर हे जसं काही वाचनाचे प्रकार हे केवळ भाषा, कथा, काद्म्बार्या, कविता, ललित इ. च्या हि पलीकडे जाऊन पोटजाती पर्यंत (आता प्रकाराला संकोचित बोलू कि विस्तारित हि खरच एक गोची आहे.) न्हेनं विशेष योग्य वाटत नाहीं. पण काय करणार जित्याची खोड हि मेल्याशिवाय जात नाहीं असं काहीतरी म्हणतात ना.....ते योग्यच आहे.

       बलुतं हे केवळ पुस्तक नसून, दगडू मारुती पवार ह्याच्या आयुष्याचा एक विलक्षण असा आढावा आहे, तो आढावा मनाला इतका हुर्हुरी लावून जातो कि उत्तार्धात गर्दीतून जाताना हरवलेला दगडू शेवटी खूप काळ मनात रेंगाळत राहतो, येउन जाऊन विचारांची जंत्री डोक्यात घर करून ठिया मांडून बसते. काय झालं असेल त्या दगडूच  नंतर? काय तो असंतोष असेल जो शब्दरुपी फुटला.

     बोलणार्यांनी तर पुस्तकावर तोंडसुख घेतलं असं स्पष्ट लेखकाने नमूद केलं आहे पण बोलणार्यांना हे का नाहीं कळत कि कोण का उगीच आपल्या आयुष्यातल्या आणि महत्वाचं म्हणजे स्वतःच्या चार भिंतीतल्या 'गुपित' गोष्टी अशा प्रदर्शन केल्या सारखं मांडेल?  आपल्या बायकोचं कळलेलं संभ्रमित प्रकरण असो कि आपल्या आईची वेश्या व्यवसाय करणारी बहिण जमनाबाई असो, फार धाडस लागतं अश्या गोष्टी एक लेखकाने स्वीकारून लिहिणे. पण खंत ह्याचीच आहे कि तोंडसुख घेणार्यांनी अश्या संदर्भाचा बोभाटा करणे. अन्यथा त्यांना ८०% पुस्तकात समाजाचे ते कारून व हृदय हेलावणार चित्रण दिसलं नसावं का असा प्रश्न पडतो. तोंडसुख घेणाऱ्यांची संख्या, ही पुस्तक पसंतीस उतरलेल्या समीक्षक आणि वाचकांपेक्षा फारच कमी आहे, कारण विविध थरात आणि वर्गात ह्या पुस्तकाला विशेष पसंती दिली गेली आहे.

      नाहीं म्हणालं तरी दगडू चा जीवनक्रम हा वाचकाला मध्येच धक्का देण्याचे काम इतक्याबखुबीने करत असतो कि मनात विचार येतोच, 'अर्रे रे!!! .... काय हे...'. पुस्तकाच्या उत्तार्धात, जेव्हा वाचकाची अपेक्षा असते कि आता दगडूच्या कहाणीचा शेवट आला आहे तेव्हा सई च प्रकरण मनाला चटका लावून जातं. हे प्रकरण खरच इतकं अनपेक्षित आणि साळसूद पणे लिखाणात आला आहे कि दगडू आणि सई  वेगळे होणार ह्याची कल्पना सुद्धा करवत नाहीं. आणि हे असं का घडलं त्या मागे काय कारण होतं, किती खरं होतं आणि किती खोटं ह्या अश्या प्रश्नांचं काहूर डोक्यात उठतं. नकळत वाईट वाटतं ते बकुळेच, काय झालं असेल तिचं नंतर? दगडू आणि तिची भेट घडली असेल का? ह्या गोष्टींचा न लागलेला थांगपत्ताच, कुठेतरी पुस्तक संपून देखील भंडावनाऱ्या विचारांमुळे उत्तराच्या शोधात मनात काहूर माजवून सोडतो. असाच आघात करून जाते ती जमनाबाई, आयुष्याची काय खेळी असते हे जमनाबाईची शोकांतिका सांगते. का असं घडलं असेल हे कळून राहत नाहीं. जेव्हा दगडू दादर येथे जमनाबाईला बघून तिच्या वाईट परिस्थितीत तिला न बघितल्या सारखं करतो तेव्हा वाचकाला दगदूचा राग आला नाहीं तर नवल. दगडूच हॉस्टेल जीवन हे तितकंच व्यथीत करणारं आहे.... साध शिक्षणासाठी सुद्धा किती जीवाचा आटापिटा करावा लागतो हे खरच अन्यायकारक आहे. आणि तितकच व्यथीत आई मुलाचं हॉस्टेल मधलं नातं करतं. बाबासाहेबांच्या महापारीनिर्वाना नंतर स्वतःला पुढारी म्हणवून घेणार्यांचा वागणं आणि त्यांचा सावळा कारभार आश्चर्यचकित करून टाकतो, कदाचित आज हि हे असंच काहीतरी कारण असेल ह्या समाजाच्या आजच्या फार तितक्याश्या न बदललेल्या परिस्थितीला.

     पु लं नी बलुतं बद्दल लिहिताना नमूद केलं आहे कि, इतकं जीवनाचा कारुण दर्शन घडल्यावर वाचक आपसूकच माणूस म्हणून स्वतःत योग्य ते बदल माणूसकीपायी  करून घेईल. एखाद्या साहित्याचा ह्याहून हि अधिक यश आणि गौरव तो काय असेल?

     आज दगडू केवळ पुस्तकरूपी हयात असला तरी एक विचार राहतोच मनात, दगडूच्या आयुष्यातल्या सोनेरी दिवसांची झालेली हेळसांड, गेलेला काळ कधी भरून देऊ शकतो का?
                                शिळेखाली हात होता, तरी नाहीं फोडला हंबरडा
                                किती जन्माची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा...

No comments: